दत्तात्रय परशुराम करमरकर- जन्म- २० जुलै १९०२. जन्मस्थान- मंटूर जि. धारवाड, शिक्षण- एम.ए.एल.एल.बी. व्यवसाय- सुरुवातीस वकीली केली व नंतर स्वातंत्र संग्रामात पडले. विवाह- २ नोव्हेंबर १९३६.
भार्या- सौ. शांताबाई- जन्मस्थान- धारवाड, शिक्षण- मॅट्रीकपर्यंत, व्यवसाय- गृहिणी व नंतर
स्वातंत्र संग्रामात भाग घेतला व तुरुंगवासही भोगला. ह्या धारवाडचे प्रसिध्द वकील श्री. मधुराव कबूर ह्यांची कन्या.
कुलाचार- पूर्वी ह्यांचे घरात नवरात्र, व मंगलकार्यानंतर बोडण व रोजची पूजा होत असे. परंतु श्री. दत्तात्रय परशुराम
स्वातंत्र संग्रामात पडल्यापासून विविध जातीतील देशबांधव हरिजनांपासून ते वाण्यांपर्यंत, सभा, चहापाणी व वेळप्रसंगी भोजनासही ह्यांचेकडे येत असत. तेव्हापासून हे सर्व कुलाचार व पूजा-अर्चा त्यांनी बंद केली. स्वातंत्रदेवीची पूजा हीच मुख्य धरली जाऊ लागली.
    ह्यांना अण्णासाहेब म्हणून ओळखले जात असे. १९४७ साली ते असेंब्लीवर निवडून आले. १९५० साली वाणिज्य व उद्योगमंत्री झाले. ५६ ते ६२ पर्यंत आरोग्यमंत्री म्हणून काम केले. त्यानंतर ६ वर्षे राज्यसभेचे सदस्य होते. ह्या अवधीत १३ ते १४ वेळा परदेशात जाऊन आले. आणि सर्वात शेवटी मृत्यूपूर्वी अगदी अखेरपर्यंत विद्यागिरी धारवाड येथे Economic Reasearch Centre  चे  Honourary डायरेक्टर म्हणून काम पाहिले.
    श्री. अण्णासाहेबांचा अल्प परिचय त्यांची जेष्ठ कन्या सौ. मोहिनी मनोहर जोशी ह्यांनी अण्णांच्या ८६ वर्षाच्या वाढदिवसाला 'सन्मार्ग मित्र' सप्‍टेंबर/ऑक्टोबर १९८८ च्या आवृत्तीत दिला होता. त्याचा सारांश पुढीलप्रमाणे-
    श्री. अण्णासाहेब करमरकर एक उत्तुंग व्यक्तिमत्व
    कोकणातील एका प्रसन्न व्यक्तिमत्वाच्या कर्तृत्वाच्या प्राजक्ताची फुले कर्नाटाकात पडली आणि अवघा कर्नाटक दरवळून निघाला. त्याचा सुगंध इतका की तो सर्वदूर पसरला. राजधानीमध्ये तो विराजमान झाला. ह्या परिपूर्ण व्यक्तिमत्वाचे नाव श्री. अण्णासाहेब उर्फ दत्तात्रय परशुराम करमरकर. यांच्या वयाला २० जुलै १९९८ रोजी ८६ वर्षे पूर्ण झाली.
    अण्णासाहेबांच्या
कर्तृत्वाचा आलेख कुलबांधवांसमोर ठेवणे मला जास्त औचित्यपूर्ण वाटतं. १९४७ ते १९६८ पर्यंतचा काळ त्यांनी पार्लमेंटमध्ये आपल्या कसदार नेतृत्वाने गाजवला. १९४७ मध्ये ते लोकसभेवर निवडून आले १९५० साली डिसेंबरमध्ये 'कॉमर्स ऍन्ड इंडस्ट्रीजचे' मंत्री म्हणून त्यांचा शपथविधी झाला. १९५० साली ते अमेरिकेला एकेकचे लीडर म्हणून तीन महिन्यासाठी गेले होते. इंडियन एम्बसीने देलेल्या पार्टीत त्यांची श्रीमती विजयालक्ष्मी पंडित यांचेबरोबर भेट झाली. त्याच वेळेस श्रीमती विजयालक्ष्मी यांना श्री. अण्णासाहेबांच्या कर्तृत्वाची, धडाडीची तसेच कर्तव्यनिष्ठेची प्रचिती आली. त्यांनी जवाहरलालजींना त्यांची माहिती दिली. त्या म्हणाल्या ' तू सध्या चांगल्या मिनिस्टरच्या शोधात आहेस, तेव्हा तू या तरूण व्यक्तिमत्वाचा विचार करावा. दुसर्‍या दिवशी पं. जवाहरलाल नेहरु व श्री. अण्णासाहेब यांच्यात चर्चा झाली. एवढ्या आदरणीय व्यक्तिशी बोलण्याची पहिलीच वेळ असल्यामुळे ते किंचीत भांबावले होते.
    पंडितजी आपला दौरा संपवून पुनश्च भारतात आले. अल्पावधीतच अण्णासाहेबांना एक सुखद तार मिळाली, मजकूर असा होता - मंत्रीपदी नियुक्ति, त्वरीत यावे, अण्णांच्या विमानाने लगेचच दिल्लीकडे झेप घेतली इतकी वर्षे कॉंग्रेससाठी आपले आयुष्य वाहून घेतलेल्या, कोणत्याही संकटाची पर्वा न करता धडाडीचे जीवन जगणार्‍या अण्णांचे अपार कौतुक झाले.
    इ.स. १९५५ पर्यंत त्यांनी व्यापारमंत्री म्हणून बहुमोल कार्य केले त्या निमित्ताने जवळपास १४/१५ वेळा अमेरिका, जपान, लंडन, स्वित्झर्लंड, जिनेव्हा, पाकिस्थान या ठिकाणी जाऊन तेथील राजदूत व मंत्री यांना भेटून वाटाघाटी केल्या.
    पंडितजींचा अण्णासाहेबांवर अपार विश्वास. लोक म्हणाले करमरकर धारवाडमध्ये निवडून येणार नाहीत, तेव्हा नेहरुंनी विश्वास व्यक्त केला, ' करमरकर देशाच्या कोठल्याही भागातून निवडून येणारच.' (त्याचप्रमाणे ते निवडून आले तेही भरघोस यशाने ५ जणांचे डिपॉझीट जप्‍त करुन).
    कोणत्याही खात्याचा मंत्री रजेवर असल्यास त्याच खाते पंडितजी मोठ्या विश्वासाने अण्णासाहेबांकडे सोपवित असत. असेच एकदा माननीय सी.सी.विश्वास(कायदा मंत्री) आजारी असताना त्यांचे खाते अण्णासाहेबांनी चोखपणे सांभाळले. त्याच वेळेस हिंदु-कोड बिलाकडे काही सुधारणा करावयाच्या होत्या. त्यावेळी त्यांनी अपार परिश्रम घेतले. त्यांनी एक कमिटी नेमून मुला-मुलींना विचारून, अनुभवी माता-पित्यांना विचारुन विवाह कायद्यात सुयोग्य असे बदल कै. लालबहाद्दूर शास्त्रीय रेल्वेचे मंत्रीपद शास्त्रीजींच्या अनुपस्थितीत समर्थपणे सांभाळले.
    मंत्रीपदावर असताना सुध्दा त्यांची त्यागी वृत्ती, निर्व्यसनीपणा व कर्तव्यनिष्ठा यांमध्ये किंचीतही उणीव भासली नाही.
    १९५५ साली केंद्रीय आरोग्यमंत्री म्हणून ते नावारुपास आले. या खात्याची जबाबदारी त्यांनी उत्कृष्टपणे सांभाळली. एलोपथीबरोबरच त्यांनी आयुर्वेद व होमिओपथीचे समग्र वाचन केले. वेळोवेळी संबधीत डॉक्टरांशी चर्चा केली.
    त्यांच्या कारकीर्दीत मनोरुग्णांची पहिली परिषद आयोजित केली गेली. पुण्यातील प्रसिध्द मानसोपचार तज्ञ डॉ. व्ही. आर. देव अद्यापही त्या परिषदेचे पुन:स्मरण करतात. नुसत्याच दवाखान्यांच्या उद्‌घाटनांना न जाता त्यांनी बर्‍याच परिषदा भरविल्या त्यातील उल्लेखनीय परिषद १९६२ मधील जागतिक आरोग्य परिषद. ह्या परिषदेचे अध्यक्षपद राणी एलिझाबेथ ह्यांनी भूषविले होते. अध्यक्षपदावरुन बोलताना राणीने देशाच्या आरोग्यस्थितीबाबत समाधान व्यक्त केले. अण्णासाहेबांनी आपल्या कारकिर्दीत कुटुंबनियोजनास विशेष महत्त्व दिले. प्रत्येक राज्यात जाऊन शिबिरे भरविली. त्याला चांगला प्रतिसाद मिळत गेला. त्यांनी निसर्गोपचार केंद्रांना प्रेरणा देऊन त्यांचे महत्त्व विशद केले. माणूस आजारी पडल्यानंतर उपचार करण्यापेक्षा तो आजारी पडूच नये म्हणून काही उपाययोजना कराव्या यासाठी प्रयत्‍न केले. त्यासाठी तज्ञ डॉक्टरांची व्याख्याने शिबिरामधून ठेवली. अण्णासाहेबांनी अनेक वैद्यकीय महाविद्यालयांची स्थापना केली.
    देशाची राजकीय धुरा सांभाळताना त्यांचे मन रुक्ष झाले नव्हते. त्यांच्या मनाची हिरवळ ताजी होती. त्यांचे निसर्गप्रेम आवर्जुन उल्लेख करण्यासारखे. माझ्या वयाच्या तिसर्‍या वर्षापासून कर्नाटकात मुलींनी रोज फुलं घालायची प्रथा. ती प्रथा जोपासण्यासाठी ६२ तर्‍हेची फुलांची व अनेक प्रकारच्या फळझाडांची जणू लागवडच त्यांच्या घरी म्हणजे ७ रेसकोर्स येथे केली होती. पपनस तर एकेका झाडाला ५००/५०० यायचे. पंडितजींना त्यांच्याकडील पपनस फार आवडायचे. अण्णांची मुले जाताना करंडी भरुन घेऊन जायचे. इंदिरा गांधी त्यांची पोच द्यायला कधी विसरायच्या नाहीत. केळ्यांचे बन तर प्रेक्षणीय. १०० प्रकारची केळी त्यात होती. ह्यांच्याघरी कांदे बटाट्याखेरीज कधी भाजी आणावी लागली नाही.
    त्यांच्या निसर्गप्रेमाचा दाखला स्वातंत्र्यसमरात ते जेव्हा तुरुंगात असत, तेव्हा त्यांची मुलगी मोहिनी त्यांना विचारायची परत केव्हा येणार? ते उत्तर द्यायचे 'मोगर्‍याला जेव्हा पालवी फुटेल तेव्हा.' त्यांना ते नेमके समजायचे, त्यांच्या मुलीचे लक्ष पालवी फुटण्याकडे लागून रहावयाचे.
    अशा या असामान्य नेतृत्वशक्तीचे बालपण काही घटनांची नोंद करुन जाते. त्यांचा जन्म २० जुलै १९०२ रोजी कर्नाटकातील मंटूर या गावी झाला. ते मूळचे रत्‍नागिरीचे. रत्‍नागिरीतील आडी शिरगाव हे त्यांचे मूळ गाव. त्यांचे वडील कर्नाटकात येऊन स्थायिक झाले. शिक्षणानिमित्त धारवाडला घर केले. शालेय जीवनातील एक प्रसंग संस्मरणीय. धारवाडच्या व्हिक्टोरिया हायस्कूल मध्ये अण्णा इंग्रजी तिसर्‍या इयत्तेत शिकत असताना लो. टिळक भेट देण्यासाठी आले. लोकमान्यांना व्यासपीठापर्यंत आणण्यासाठी ५ घोड्यांची गाडी तयार होती. त्यातले दोन घोडे स्वैरभैर झाले व सुटले.त्यांना परत आणीपर्यंत अण्णांनी ती गाडी खेचून धरली होती. त्यांचे मनोधैर्य पाहून लोकमान्यांनी भविष्य वर्तविले की हा मुलगा पुढे लोकविलक्षण निघेल आणि ती भविष्यवाणी खरी ठरली. लो. टिळक हे त्यांचे श्रध्दास्थान. टिळकांच्या विचारधारेप्रमाणेच त्यांनी सर्व कार्य केले. अण्णा पुण्याच्या डेक्कन कॉलेज मध्ये शिक्षण घेत असताना अण्णा, जस्टीस पी.बी. गजेंद्र गडकर आणि आय. जी. पी. कामठे अशा तिघांचा गट होता ही त्यांची मैत्री अभंग राहिली. प्रत्येकजण आपापल्या क्षेत्रात उच्च स्तरावर पोहोचला.
    सेवादलात काम करणार्‍या श्री. मधुराव कबूर यांच्या कन्या शांताबाई यांच्याशी त्यांचा प्रेमविवाह झाला. अण्णांच्या पत्‍नी शांताबाई यांची त्यांना उत्तम साथ लाभली. शेवटी ते धारवाडमध्ये आर्थिक संशोधन केंद्राचे ऑनरर्स डायरेक्टर म्हणून काम पाहात असत. मानधन स्विकारत नसत. आपला वाचनाचा छंद त्यांनी जोपासला. हेल्थ इन इंडिया हे वार्षिक ते प्रसिध्द करीत. घरी येणार्‍या कोणत्याही गरजू व्यक्तीला ते विन्मुख पाठवत नसत.
     आयुष्यात एकही इंजेक्शन न घेतलेले हे आरोग्य संपन्न व्यक्तीमत्व वयाच्या ८८व्या वर्षी हरपले. ह्या चिरतरूण व्यक्तिमत्वाला शतश: प्रणाम. कर्नाटकातला हा प्राजक्त पुन्हा विद्यागिरी धारवाड ५८०००४ कर्नाटकात परतला. त्याचा सुगंध आजही दरवळत आहे व ह्यापुढेही अखंड दरवळत राहील.